Centre for Internet & Society

News about digitalization of Konkani Vishwakosh, appeared in Navprabha daily on October 22, 2013 on front page.


Click to read the original published in Navprabha on October 22, 2013.


गोवा विद्यापीठाचा प्रकल्प असलेला कोंकणी विश्‍वकोश हा लवकरच विकिपीडिया या ऑनलाइन विश्‍वकोशावर संपूर्ण जगासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. कोंकणी विश्‍वकोशाच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया सुरू झाली असून ती येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याची योजना आहे.

क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सखाली कोंकणी विश्‍वकोशाचे पुन:प्रकाशन करण्याचे हल्लीच गोवा विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले होते. अशाप्रकारचा हा देशातील अनोखा प्रयोग ठरेल. यामुळे विश्‍वकोशाचा अभ्यासकांना अधिक मुक्तपणे वापर करता येईल. क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सखाली मूळ मालकाला हक्क राखता येतातच पण वापरकर्त्यांनाही माहितीत भर टाकण्याची, ती अधिक विकसित करण्याची मुभा मिळते.

आता बंगळूरस्थित सीआयएस ही संस्था गोवा विद्यापीठाच्यावतीने कोंकणी विश्‍वकोशाचे चारही खंड डिजिटल माध्यमात परिवर्तीत करून विकिपीडियाद्वारे संपूर्ण विश्‍वात नेण्याचे काम करणार आहे. एकदा हा विश्‍वकोश डिजिटल होऊन विकिपीडिया या ऑनलाईन ज्ञानकोशावर गेल्यानंतर या विकिपीडियावर जगातील इतर भाषांप्रमाणेच कोंकणीतून ज्ञानात्मक मजकूर निर्माण करणे तसेच चटकन संदर्भ उपलब्ध करून देणे अधिक सोपे होणार आहे.

गोवा विद्यापीठासाठी डिजिटलायझेशनचे काम करत असलेल्या सेंटर फॉर इंटरनेट ऍन्ड सोसायटीच्या नितीका टंडन यांनी माहिती देताना सांगितले की, येत्या दोन महिन्यांत विश्‍वकोशाच्या चारही खंडांचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्याची योजना आहे. त्यासाठी गोवा विद्यापीठातील कोंकणी विभागाच्या विद्यार्थ्यांची तसेच अन्य इच्छुकांची मदत घेतली जाणार आहे.

सीआयएस संस्था विकिपिडीयावर भारतीय भाषांतील मजकूर वाढविण्यासाठी काम करते, अशी माहितीही टंडन यांनी दिली. दिल्ली, पुणे, बेंगलोर येथे असे गट कार्यरत असल्याचे त्या म्हणाल्या. कोंकणी भाषेतून विकिपीडियावर फारच कमी मजकूर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तो वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी हल्लीच गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विभागातील विद्यार्थ्यांना एक खास कार्यशाळाही घेण्यात आली होती. कोंकणी विश्‍वकोश एकुण चार छापील खंडांत असून या खंडांचे प्रकाशन गोवा विद्यापीठातर्फे ग्रंथरूपात १९९१,१९९७,१९९९ व २००० साली याप्रमाणे झाले होते. पहिल्या दोन खंडांचे संपादन मनोहरराय सरदेसाय यांनी तर खंड तीन व चारचे संपादन डॉ. तानाजी हळर्णकर यांनी केले होते. या चार छापील ग्रंथरूपातील खंडांची पृष्ठसंख्या ८६३, ९३४, ८२४ व १०११ अशी आहे.

दरम्यान, विकिपीडिया संकेतस्थळ हे इंटरनेटवर सर्वाधिक भेट दिले जाणारे चौथ्या क्रमांकाचे संकेतस्थळ आहे.